ऐका हो तुटले
ऐका हो तुटले परदास्याचे बंध
धुम् धडाड धुम् हो रायगडवर नाद॥धृ॥
पाडवा आज नच तरी गुढ्या वरि चढल्या
चहुंकडे तोरणे रांगोळ्याही सजल्या
तोफांच्या नादे होति दिशा दश धुंद॥१॥
अंबरात भगवा ध्वज डौलाने डोले
रक्षणार्थ त्याच्या असंख्य सेना चाले
चौफेर पसरला आनंदी आनंद॥२॥
किल्ल्यांचे वळले दिल्लिकडे दरवाजे
जणु शिवरायांची इच्छा त्यांना उमजे
ते दूर न उरले आता काश्मिर सिंध॥३॥
नव उत्साहाने हिंदुजाति संचरली
दुष्टांची ह्रदये भीतीने धडधडली
दडवतील तोंडे आता शत्रु मदांध॥४॥
ही नव्या युगाची वाजे नौबत आज
जाहले शिवाजी छत्रपती महाराज
हे त्यांचे निर्मल यश जणु प्रतिपच्चंद्र॥५॥
अभिधान सार्थ हे व्हावे हिंदुस्थान
म्हणुनिया जिवाचे ज्यांनी केले रान
त्याचीच तपस्या हे सिंहासन वंद्य॥६।।
No comments:
Post a Comment