स्वप्न मनोहर भरतभूमिचे
------------------------------
उदास तन-मन उदास जन-जन
अवचित का जाहले ?
स्वप्न मनोहर भरतभूमिचे
आज भंग पावले
प्रखर ध्येयनिष्ठा आम्ही या
सुखस्वप्नी पाहिली
आणि देखिली गुणसुमने, जी
मातृपदी वाहिली
निज स्वार्थाचा होम करोनी
यज्ञकुंड शांतले
स्वप्न मनोहर भरतभूमिचे
आज भंग पावले
दिव्य स्वप्न जे होते पडले
गोमंतक भूमीला
संघस्थानी ते रुजले अन्
अर्पियले जननीला
असे स्वप्न कोसळता येथे
किती ऊर फाटले
स्वप्न मनोहर भरतभूमिचे
आज भंग पावले
सुविद्य, सालस, बुजरे किंचित
निजकार्यी नित व्यस्त
मात्र दर्शने या स्वप्नाच्या
सुजनशक्ती आश्वस्त
राजनीतिच्या दलदलीतुनी
कमल जणु जे फुलले
स्वप्न मनोहर भरतभूमिचे
आज भंग पावले
मात्र भंगल्या या स्वप्नातुन
तशीच स्वप्ने पुन्हा पडो
परमवैभवी राष्ट्र न्यावया
व्यक्ति व्यक्ति देशार्थ घडो
याविण द्यावे काय अभिवचन ?
इथे शब्द थांबले !
स्वप्न मनोहर भरतभूमिचे
आज भंग पावले
No comments:
Post a Comment