व्हावे जीवन यज्ञसमर्पण
व्हावे जीवन यज्ञसमर्पण
समिधामय ही काया साधन॥
अभिमानाची फुंकर मारुन
निद्रित वन्ही पुनश्च फुलवुन
दिव्य नभासी ज्वाला भिडवुन
तेजे भरण्या अपुले जीवन॥१॥
दारुण हे रण आज पेटले
भयाण कंदन की जरि घडले
मोह मनींचे टाकुनि दिधले
प्रतिकाराचा घेउनिया प्रण॥२॥
राहुनि निर्भर बाहुबलावर
धरी सुदर्शन श्रीहरिचा कर
शार्ड़गधनूचा नाद भयंकर
पांचजन्य रणभेरी फुंकुन॥३॥
एकमात्र ही गीता गाउन
यज्ञसांगता ऋत्विज होउन
अर्पित अवघे हे तनमन धन
यज्ञरुप हे करण्या जीवन॥४॥
बाधुन मंदिल पुरुषार्थाचा
सज्ज जाहला रथ ध्येयाचा
कोट उभारुन संघशक्तिचा
धर्मराज्य हे करण्या स्थापन॥५॥
No comments:
Post a Comment