मी युग नव निर्मीन
मी युग नव निर्मीन
मी युग नव निर्मीन॥ धृ॥
रुखल्या सुखल्या भूमीवरती
सद्भावाने करुनी वसती
संस्कारांचे जल सिंचुनिया
सोनमळे पिकविन॥१॥
शांत सागरा जवळी जाऊन
वडवाग्नीची ओळख सांगुन
सत्कार्याच्या प्रचंड लाटा
उसळत मी ठेवीन॥२॥
येता कल्पांताची चाहुल
जन होती भयकंपित व्याकुळ
जनशक्तीला जागृत करुनी
गोवर्धन उचलीन॥३॥
कोटि कोटि मम बाहू उभवुन
नभ कोसळते अलगत झेलुन
विश्वासाचे उषःकिरण
दिग् दिगंतरी उधळीन॥४॥
ज्या एका स्वप्नाचा औरस
भारतीय मी म्हणुनी वारस
पुनः जगाच्या जीवनात
साक्षात्कार बघेन॥५॥
No comments:
Post a Comment