असती का ऐसे कुणी
बहुत असती जे यशाचे मिरविती माथी तुरे
वैभवाची शीग चढता म्हणती ना केव्हा पुरे
यश सुखाची मीठ मोहर मातृमुखी ओवाळुनी
मुक्त झाले जीवनी या असती का ऐसे कुणी?
रेखील्या परिघात ज्यांची रमून गेली मन्मति
बहुत ऐसे घरकुलांच्या सुखद स्वप्नी रंगती
होऊनि निःसंग परि जे श्रमती विजनी काननी
हिंदुराष्ट्रा जे समर्पित असती का ऐसे कुणी?
शिंपीती फुलबाग कोणी फुलविती वन वैभवे
रम्य उद्याने कुणाची गंध भरले ताटवे
बांधवांच्या आर्त हृदयी मेघसे ओसंडूनी
शिंपीती जे प्रेम अपुले असती का ऐसे कुणी?
उजळीती कोणी पसा अन उजळीती अंगण कुणी
उजळीती देवालये अन उजळीती नगरे कुणी
त्रिभुवनाला उजळणारे प्रखर ते तेजोमणी
प्राणदायी ते प्रचोदक असती का ऐसे कुणी?
No comments:
Post a Comment